Ad will apear here
Next
डर्टी डझन
कडक शिस्तीच्या, रांगड्या, पण आतून सहृदयी असं अजब मिश्रण असणाऱ्या मेजर राइझमनवर १२ खुनशी, उलट्या काळजाच्या गुन्हेगार सैनिकांना कमांडो प्रशिक्षण देऊन फ्रान्सच्या युद्धरेषेपलीकडचं जर्मन हायकमांड उद्ध्वस्त करवून घ्यायची कामगिरी सोपवली जाते. ‘प्रोजेक्ट अॅम्नेस्टी’ असं वरकरणी सभ्य नाव असलेल्या त्या मोहिमेसाठी निवडलेल्या १२ जणांच्या खतरनाक टीमला नाव दिलं जातं ‘दी डर्टी डझन!’ मेजर ती कामगिरी कशी यशस्वी करतो ते या ‘अॅक्शनपॅक्ड’ फिल्ममध्ये बघायला मिळतं. ‘सिनेसफर’मध्ये आज त्या सिनेमाविषयी...
.....................
असं  अनेकदा घडलंय, की एखाद्या नामवंत अॅक्टरनं नाकारलेली भूमिका दुसऱ्याच्या वाट्याला जाते आणि त्याच्यासाठी मात्र तो मोठ्ठा टर्निंग पॉइंट ठरतो. जॉन वेननं नाकारलेली ‘डर्टी डझन’मधली मेजर जॉन राइझमनची भूमिका ली मर्विनला असंच घवघवीत यश देऊन गेली!
 
जसजसा डी-डे (सहा जून १९४४) जवळ येत चाललाय तसतसं मित्र राष्ट्रांनी नाझी सैन्याला गोंधळात टाकण्याचे निरनिराळे प्लॅन्स आखलेत. त्यापैकीच एक भाग म्हणजे फ्रेंच सीमेपलीकडच्या नाझींच्या ठाण्यावर पॅराशूट्सच्या साहाय्यानं कमांडोंना उतरवून, हल्ला करून तिथं असलेल्या सर्व नाझी अधिकाऱ्यांना ठार करायचं. मित्र राष्ट्रांच्या वरिष्ठांकडून मेजर जॉन राइझमनवर एक आगळी कामगिरी सोपवली जाते ती म्हणजे मिलिटरी कोर्टानं खून, बलात्कार, जबरी चोरी यांसारख्या हिंस्र गुन्ह्यांबद्दल कोर्ट मार्शल करून देहदंडाची, जन्मठेपेची शिक्षा फर्मावलेल्या अट्टल गुन्हेगार कैद्यांमधून १२ कैदी निवडायचे आणि त्यांना ट्रेनिंग देऊन, फ्रान्सच्या युद्धरेषेपलीकडचं जर्मन हायकमांड उद्ध्वस्त करवून घ्यायचं, ज्याचा दुसऱ्या महायुद्धावर लक्षणीय परिणाम होऊ शकेल! ‘प्रोजेक्ट अॅम्नेस्टी’ असं वरकरणी सभ्य नाव असलेल्या त्या मोहिमेसाठी निवडलेल्या खतरनाक टीमला नाव दिलं जातं ‘दी डर्टी डझन!’...

नेपोलियन जेफरसन (जिमी ब्राउन), फ्रँको (जॉन कॅस्साव्हेटिस), व्लादिस्लाव्ह (चार्ल्स ब्रॉन्सन), आर्चर मॅगट (टेली सव्हालास) आणि सॅमसन पोझी (क्लिंट वॉकर) या पाच जणांना फाशी होणार आहे, तर डोनल्ड सदरलँड (पिंकली), टॉम बस्बी (व्लादेक), बेन कॅरदर (गिल्पीन), कॉलीन मेटलंड (सॉयर), स्ट्युअर्ट कूपर (लिव्हर), अल मँचिनी (ब्रव्होस), ट्रिनी लोपेझ (जिमिनी) या सात जणांना जन्मठेप जाहीर झाली आहे. आत्मघातकी ठरू शकणारी ती जोखीम शिरावर घ्यायला ते १२ जण तयार होतात. कारण मोहीम फत्ते झाल्यास त्यांना शिक्षेत घवघवीत सूट मिळणार असते.
 
कडक शिस्तीचा, रांगडा, पण आतून सहृदयी असं अजब मिश्रण असणारा मेजर राइझमन, त्या खुनशी, उलट्या काळजाच्या, १२ गुन्हेगार सैनिकांना कमांडो प्रशिक्षण देऊन ती कामगिरी कशी यशस्वी करतो, ते या अॅक्शनपॅक्ड फिल्ममध्ये बघायला मिळतं.

या फिल्मचं नाव युद्धकाळातल्या खऱ्या ‘फिल्दी थर्टीन’वरून (बेकर्स डझन) बेतलं होतं. अमेरिकेच्या १०१ एअरबॉर्न डिव्हिजनचं दुसऱ्या महायुद्धादरम्यान तसं १३ जणांचं एक खतरनाक कमांडो युनिट होतं. मोहॉक इंडियनसारखे केस ठेवणारे, दिवसदिवस आंघोळी न करणारे आणि गालांवर पांढरे पट्टे रंगवणारे ते ‘फिल्दी थर्टीन’ शत्रूच्या सीमेपलीकडे जाऊन वेडी साहसं करत असत. ई. एम. नेथनसनने त्यांच्या नावापासून स्फूर्ती घेऊन आपल्या कादंबरीचं नाव ‘डर्टी डझन’ ठेवलं. २० लाखाहून जास्त प्रती खपलेली ही कादंबरी एके काळी चांगलीच गाजली होती. आणि त्यावरूनच मग रॉबर्ट अॅल्ड्रिचने हा सिनेमा बनवला. 

मेजर राइझमन त्या १२ जणांच्या सिलेक्शननंतर पहिल्यांदा त्यांच्यासमोर येतो, तेव्हा बंडखोर फ्रँको शिस्तीनं रांगेत चालायला नकार देतो. मेजरनं ‘What’s the matter number eleven?’ विचारल्यावर तो त्याची खिल्ली उडवण्यासाठी ‘I got pain’ असं उत्तरतो. नंतर त्याला दुरुत्तरं करतो आणि वर ‘There is nothing you can do about me!’ असंही उद्धटपणे म्हणतो. आतून चिडलेला मेजर वरकरणी फ्रेंडली चेहरा ठेवून हसत त्याला रांगेतून जवळ बोलावतो आणि त्याला कळेल अशाच भाषेत सुनावतो! त्या वेळी दोन पावलं पुढे गेलेल्या मेजरवर चिडलेला फ्रँको मागून हल्ला करतो; पण स्वतः उत्तम कमांडो असणारा मेजर त्याला लोळवून बुटानं त्याचा चेहरा फोडतो. आपण या मेजरला गृहीत धरू शकत नाही, हे सांगणारा हा १२ जणांसाठी पहिला इशारा असतो! ली मर्विननं हा संपूर्ण सीन इतक्या झोकात केलाय, की पुनःपुन्हा बघावा. त्या नंतर बारा जणांचं मेजरच्या देखरेखीखाली ट्रेनिंग सुरू होतं, त्या वेळचे सीन्स भलतेच उत्कंठावर्धक आहेत.

मेजर एकेकाला बरोबर जोखून त्यांच्यातले चांगले गुण बाहेर काढत त्यांना तयार करत जातो. बंदुकीच्या संगिनीच्या साहाय्याने मेजरनं पोझीला डिवचत, त्याच्यामधला रागाचा उद्रेक बाहेर काढत केलेली फाइट असो किंवा जिमिनीचं रोप क्लाइम्बिंगचं ट्रेनिंग. सिनेमाच्या क्लायमॅक्स दृश्याच्या वेळी, त्या कामगिरीवर निघताना प्रत्येकानं करण्याची प्रत्येक हालचाल लक्षात राहावी म्हणून मेजरनं तयार केलेलं त्या फ्रेंच गढीचं मॉडेल आणि कोणी कुठे काय आणि कधी हालचाल करायची यासाठी त्या १६ हालचाली क्रमवार लक्षात राहण्याकरिता मेजर त्यांच्याकडून एखाद्या शिक्षकानं शाळकरी विद्यार्थ्यांकडून पाढे किंवा कविता पुनःपुन्हा म्हणवून घ्यावी, त्याप्रमाणे अगदी त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांच्याकडून पुनःपुन्हा तालावर म्हणवून घेतो. हे सगळं पाहणं मजा देतं.

या सिनेमातला हिंसाचार आणि रक्तपात क्षणभर बाजूला ठेवला, तर मात्र त्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणाऱ्या त्या बारा जणांमध्ये एकमेकांप्रती उमलत जाणारी मैत्रीची भावना आणि एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन लढाईच्या मैदानात उतरल्यावर त्यांनी जिवाची बाजी लावून दिलेली झुंज हा टच बघावा असा! दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असली, तरी या सिनेमात प्रत्यक्ष रणभूमीवरची दृश्यं नाहीत, तर फ्रेंच सीमेपलीकडे जाऊन एका गढीवर केलेल्या तुफानी हल्ल्याची दृश्यं आहेत; पण तरीही हा सिनेमा आपण एंजॉय करतो, तो त्यातल्या वेळोवेळी येणाऱ्या चुरचुरीत संवादांमुळे!
 
कर्नल ब्रीडच्या बेसकॅम्पवर ट्रेनिंग घ्यायला गेले असताना, कर्नलची गंमत करण्यासाठी मेजर राइझमन आपल्या टीममधल्या पिंकलीला खोट्या जनरलचा आवेश आणून चालण्यासाठी शिकवताना म्हणतो,  ‘You've seen a general inspecting troops before haven't you? Just walk slow, act dumb and look stupid!’

कॅप्टन स्ट्युअर्ट किंडरने त्या खतरनाक टीमचं मानसशास्त्रीय चेकअप केल्यावर मेजर राइझमन त्याला विचारतो, ‘So what does that give you?’
त्यावर कॅप्टन सांगतो, ‘Doesn't give me anything. But along with these other results, it gives YOU just about the most twisted, anti-social bunch of psychopathic deformities I have ever run into! And the worst, the most dangerous of the bunch, is Maggott. You've got one religious maniac, one malignant dwarf, two near-idiots... and the rest I don't even wanna think about!’
आणि त्यावर मेजर राइझमनचं उत्तर – ‘Well, I can't think of a better way to fight a war!’

...तर असा हा डर्टी डझन! हा सिनेमा रिलीज झाला होता जून १९६७मध्ये. त्या वेळी अमेरिकेच्या NFL  लीगमध्ये उत्तम फुटबॉलर म्हणून गाजणारा जिम ब्राउन त्यानंतर हॉलिवूडमध्ये चांगलाच रमला. त्या वेळी अगदीच नवख्या असणाऱ्या या सिनेमातल्या डोनल्ड सदरलँड या कॅनेडियन अभिनेत्यानं पुढे उत्तम सिनेमे खिशात टाकत आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. चार्ल्स ब्रॉन्सननंही पुढे आपली रांगडी इमेज जपत आपला चाहतावर्ग तयार केला. या सिनेमाच्या जबरदस्त साउंड इफेक्ट्ससाठी जॉन पॉयनरला ‘ऑस्कर’ मिळाला होता! नक्कीच पाहावा असा हा ‘डर्टी डझन!!’

- प्रसन्न पेठे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVPCJ
Similar Posts
पॅटन सैनिकांमध्ये स्फूर्ती आणि चेतना निर्माण करणारं बेधडक आणि घणाघाती भाषण करणाऱ्या आणि तितक्याच बेधडकपणे शत्रूशी लढणाऱ्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या अमेरिकेच्या जनरल पॅटनवरची फिल्म म्हणजे ‘पॅटन.’ आजच्या ‘सिनेसफर’मध्ये त्या फिल्मविषयी...
युद्धस्य कथा रम्या...! तसं पाहायला गेलं, तर अनेकांचे जीव घेणारी, अनेक कुटुंबं उद्ध्वस्त करणारी युद्ध ही गोष्ट कधीही रम्य असू शकत नाही; पण साहसकथा मनुष्याला कायमच आवडतात. त्यामुळे ‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हटलं जातं. या पार्श्वभूमीवर, ‘सिनेसफर’ सदराची सुरुवात आपण करणार आहोत ‘वॉरफिल्म्स’ या जॉनरपासून... सुरुवातीला या जॉनरबद्दल
रोमन हॉलिडे काही प्रेमकथांमध्ये प्रेमी जीव अनाहूतपणे एकत्र येतात... सहवासातून दोस्ती होते... प्रेमळ साथ मिळते... पण ते प्रेम... एका कायमस्वरूपी नात्यात बदलेपर्यंत जुदाईचा क्षण येतो आणि ते बघणारा प्रेक्षकही हळहळतो... दिग्दर्शक विली वायलरची ‘रोमन हॉलिडे’ ही अशीच चुटपुट लावणारी प्रेमकथा... ग्रेगरी पेक आणि ऑड्री हेपबर्नच्या हळुवार प्रेमाच्या प्रेमात पाडणारी कथा
फॉन रायन्स एक्स्प्रेस ‘If only one gets out, it's a victory’ असं म्हणणारा रांगडा, उतावळा ब्रिटिश मेजर फिंचम आणि थंड डोक्याने सुटकेचे प्लान्स आखणारा अमेरिकन कर्नल रायन यांच्यामधली जुगलबंदी. जर्मनव्याप्त इटलीच्या नयनरम्य प्रदेशातून मित्र राष्ट्रांच्या युद्धकैद्यांनी केलेल्या पलायनातला रोमांचक थरार मांडणारी फिल्म ‘फॉन रायन्स एक्स्प्रेस’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language